Follow us on Blogger Follow us on Facebook Follow us on Twitter Follow  on Google Plus Follow us on Linkedin Follow  on Instagram
Articles
खुला आसमान… एक अमर्याद स्वप्न
Khula Aasmaan article in Maharashtra Times खुला आसमानचे बीज २०१२ मध्ये घडलेल्या एका प्रसंगातून रोवले गेले. कुमाऊं पर्वतांच्या दुर्गम भागात, जिथे रस्ते नाहीत, अशा परिसरात चालताना, एका वस्तीतून सुमारे १० वर्षांचा एक मुलगा त्याच्या कुत्र्यासोबत आमच्याबरोबर चालू लागला. गप्पागोष्टी करताना त्या मुलाला सहज विचारले की तुला मोठे झाल्यावर काय व्हावेसे वाटते. क्षणार्धात त्याने सांगितलं की मला वैज्ञानिक व्हायचंय. मी थक्क झालो, कारण आजपर्यंत अनेक मुलांबरोबर बोलताना असं उत्तर मिळालं नव्हतं. हा मुलगा, जो अशा दूरवरच्या, रस्तेसुद्धा नसलेल्या प्रदेशात राहतो, तो असा वेगळा विचार करू शकतो, ही मला खूप मोठी गोष्ट वाटली. तेव्हा जाणवलं की हा दुर्लक्षित असा ‘युवा भारत’ आहे, ज्याची जोपासना करणं गरजेचं आहे. तसेही कित्येक दिवस माझ्या मनात घोळत होतंच की, आपली शिक्षणव्यवस्था सृजनशील विचारांना प्रोत्साहन देत नाही. परिणामतः मुलांमधील सृजनशील क्षमता आणि कल्पकता हळूहळू लयाला जाते. तेव्हा ठरवलं की मुलांमधील सृजनशीलता जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाला आणि तरुणाला सहज व विनामूल्य भाग घेता येईल असे व्यासपीठ निर्माण करायचे.

चार वर्षं विविध प्रयोग व चाचण्या घेतल्यानंतर, ऑक्टोबर २०१६मध्ये ‘खुला आसमान’ची सुरवात झाली. नावाप्रमाणेच ‘खुला आसमान’ ला काहीही बंधने नाहीत आणि हे अगदी मुक्त-खुले आहे, विनामूल्य आहे. ह्यात दोन वयोगट आहेत - ५ ते १५ आणि १५ ते २५. दर तीन महिन्यांनी नवीन स्पर्धेला सुरुवात होते. काही विषय सुचविलेले असतात, त्याव्यतिरिक्त बालकांना व युवकांना त्यांना आवडलेल्या कोणत्याही विषयावर कलाकृती करण्याची मुभा आहे. तसेच माध्यम वापरावरही बंधन नाही. ते पेन्सिल, क्रेयॉन, स्केच पेन्स, जलरंग, अॅक्रेलिक किंवा तैलरंग वापरू शकतात. त्यांची कलाकृती ही ड्रॉइंग, डूडल, स्केच, पेन्टिंग, डिजिटल आर्ट, पोस्टर किंवा छायाचित्र (फोटो) यातले काहीही असू शकते. सादरीकरण ऑनलाइन आहे आणि सर्व प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यांनी केवळ एवढेच करावयाचे आहे: त्यांच्या कलाकृतीचा स्मार्टफोनच्या साहाय्याने फोटो काढून ऑनलाइन सादर करावयाचा. हे सबमिशन २४ X ७ करता येते.

मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल अशा व्हिडीओ फिल्म्स निर्माण करण्याचे काम आता खुला आसमानने हाती घेतले आहे. पेन्टिंग, शिल्पकला,फोटोग्राफी, सिनेमा, साहित्य, थिएटर, संगीत, नृत्यकला, शास्त्र, तंज्ञज्ञान आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींबरोबर हे व्हिडीओ केले जातील व खुला आसमानच्या व्यासपीठावर ते उपलब्ध केले जातील.

केवळ चित्रकार निर्माण करणे हे खुला आसमानचे उद्दिष्ट नसून, स्वतंत्र विचार करणारी आणि सौंदर्यदृष्टी असणारी नवीन पिढी निर्माण करणे हे खुला आसमानचे स्वप्न आहे. खुला आसमानमध्ये भाग घेणारे काहीजण नक्कीच मोठे चित्रकार , शिल्पकार व फोटोग्राफर होतील. परंतु त्याही पेक्षा मोठ्या संख्येने स्वतंत्र विचार करणारे आणि सौंदर्यदृष्टीची जाण असणारे शास्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, शिक्षक, नगरसेवक, व्यापारी आणि अन्य व्यावसायिक यातून घडतील.

खुला आसमानला सर्वस्तरांमधून-विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा आणि कॉलेजेस यांच्याकडून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षात भारतातल्या ३००हून अधिक ठिकाणांहून विद्यार्थ्यांनी खुला आसमानमध्ये भाग घेतला आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून विद्यार्थी भाग घेतच आहेत. परंतु, विशेष आनंदाची बाब म्हणजे, पंजाब, उत्तरप्रदेश, झारखंड, उत्तराखंड, ओडिशा, केरळ आणि इतर अनेक दूरस्थ प्रदेशांमधील खेडेगावांतून आणि लहान नगरांमधून उत्साही प्रतिसाद मिळत आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीय कुटुंबांमधील मुलेसुद्धा आता खुला आसमानमध्ये उत्साहाने भाग घेत आहेत.

या दिवाळीमध्ये ‘खुला आसमान’च्या अनावरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. ह्या निमित्ताने पुरस्कारविजेत्या कलाकृती १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे खास प्रदर्शनात प्रदर्शित केल्या जातील. नव्या पिढीने निर्माण केलेल्या कलाकृती पाहण्यासाठी तुमच्या कुटुंबातील लहानांना आणि तरुणांना घेऊन अवश्य या. ज्यांना दिवाळीत मुंबईला येणे जमणार नसेल त्यांना हे प्रदर्शन www.indiaart.com ह्या संकेतस्थळावर बघता येईल. तसेच ५-१५ आणि १५-२५ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना ह्याच संकेतस्थळावर ‘खुला आसमान’ मध्ये भाग घेता येईल.

(लेखक Indiaart.com आणि Indiaart Gallery चे संस्थापक आहेत तसेच खुला आसमानचे निर्माता आहेत.)