Follow us on Blogger Follow us on Facebook Follow us on Twitter Follow  on Google Plus Follow us on Linkedin Follow  on Instagram
Articles
केल्याने देशाटन चातुर्य येतसे फार
केल्याने देशाटन चातुर्य येतसे फार प्रवास! जीवनाला दिशा देईल खास... लहानपणी पुस्तकांत एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. पण हे चातुर्य खूप प्रवास केल्यानंतर मोठेपणी प्राप्त झाले. खरोखर नवनवीन ठिकाणांना केलेल्या प्रवासाचा अनुभव जीवन किती समृद्ध करुन सोडतो, हे त्यातून उमगले.

मला आठवतं की मध्ययुगीन काळात चीनी, ग्रीक आणि इतर युरोपीय पर्यटकांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली प्रवास वर्णने वाचण्याचे मला नेहमी आकर्षण वाटायचे. ही वर्णने म्हणजे फक्त त्यांनी ज्या स्थळांना भेटी दिल्या त्यांची माहीती नव्हती. तर त्यामध्ये या पर्यटकांनी तत्कालीन राजवटी, राज्य प्रशासन व्यवस्थेबद्दल, राजमहाल व प्रेक्षणीय वास्तूंबद्दलही आपली निरीक्षणे नोंदवली आहेत व त्यांवर भाष्य केले आहे. ही वर्णने म्हणजे ऐतिहासिक माहिती देणारे स्त्रोतच आहेत. जर यांचा एकत्रित अभ्यास केला गेला तर ही प्रवास वर्णने आपल्याला इतिहासात डोकावून पाहण्याची संधी देतात.

इंटरनेट सारख्या तंत्रज्ञानामुळे आता जग एकदम जवळ आले आहे, परंतु माहितीचे कितीही आदान-प्रदान करता येत असले तरी प्रत्यक्ष माणसा-माणसातील देवाण-घेवाणीस ते पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे माणसाचा माणसाशी असलेला संवाद हा कायमच महत्त्वाचा राहणार आहे. लहानपणी केलेला प्रवास आणि त्यादरम्यान घडलेल्या घटना माझ्या डोळ्यासमोरून आजही तरळून जातात. हा प्रवास म्हणजे रेल्वेतून केलेला लांब पल्ल्याचा असायचा. त्यावेळी जणूकाही रेल्वेचे उशिरा येणे हा नियमच असे. यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून फेरफटका मारायची भरपूर संधी मिळायची. यामुळे पर्यटक, मालवाहतूक करणारे, विक्रेते, भिकारी, आपल्या नातेवाईकांना प्लॅटफॉर्मवर सोडायला आलेले लोक आणि कुत्रीसुद्धा पाहायला मिळायची. त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणजे घरच असायचे. स्वच्छता हा अपवाद वगळता एसटी बस स्थानकाची कहाणी याहून फार काही वेगळी नसायची. तरीही रेल्वेचा प्रवास करताना जो आनंद मिळायचा त्याचे मोजमाप करता येणार नाही. लहान मुलांसाठी खिडकीजवळची सीट मिळणे म्हणजे एक पर्वणीच असे. गाडी छोटी स्थानके, शेते, लहान गावे मागे टाकत जात असताना ते खिडकीतून पाहण्यात खूपच मजा यायची. वाफेवर चालणाऱ्या इंजिन वरून प्रवास संपल्याची पावती मिळायची आणि चेहऱ्यावर, कपड्यांवर लहान-लहान कोळशाचे कण आपले अस्तित्व दाखवून द्यायचे.

पण हे सगळे मागे पडून आता या गोष्टींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. आज प्रवासासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्याच्या काळात तुम्ही स्वतःच्या वाहनाने किंवा वाहन भाडेतत्त्वावर घेऊन प्रवास करू शकता. याखेरीज सुपर फास्ट रेल्वे, आरामदायी बस, तसेच परवडणाऱ्या दरात विमानसेवादेखील उपलब्ध आहेत. आज खिशातील स्मार्ट फोनवरील ॲपच्या मदतीने आपण आपल्या प्रवासासाठी केव्हाही आणि कुठूनही बुकिंग्स करू शकतो. या वाढत्या पर्यायांमुळे प्रवासाचे आकर्षण वाढले आहे. आज आपण भारतात कुठूनही कोठेही बस, रेल्वे किंवा विमानाच्या सहाय्याने जलद प्रवास करू शकतो. आजची पिढी विनासायास भारतातच नव्हे तर जगभरात कुठेही जाऊ शकते याबाबतीत मला आजच्या युवकांबदल थोडा मत्सरच वाटतो, असं म्हणलं तरी हरकत नाही.

इंटरनेटमुळेच आपल्याला आज प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाते. नियोजित स्थळी कसे पोहोचायचे, कुठे राहायचे, काय पाहायचे अशी भरपूर माहिती इंटरनेट आपल्याला पुरवते. मला माझ्या तरुण मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सांगावेसे वाटते कि आपल्या सुट्ट्यांचा शक्य तेवढा वापर आपल्या या सुंदर देशातील वेगवेगळी ठिकाणे पाहण्यासाठी करा. विविध भू-रचना, पर्वत, बदलते वातावरण, किनारपट्टीचा प्रदेश, ऐतिहासिक स्थळ, वारसा स्थळ,जंगलं, जंगली अभयारण्ये, देवस्थाने अशी अनेक ठिकाणे भारतात आहेत जी अवश्य पाहण्याजोगी आहेत. फक्त बाहेर पडा आणि या जागांचा आस्वाद घ्या. या जागा पाहताना त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कंगोरे जाणून घेण्याचे प्रयत्न करा. तिथले भोजन चाखा, तिथल्या लोकांशी संवाद साधा आणि कशा प्रकारे ते लोक आपलं जीवन जगतात ते समजून घ्या. प्रत्येक प्रवास हा एक अनुभव आहे. तो पूर्णपणे जगा. पर्यटन करताना तुमच्या मित्रांना, घरच्यांना पत्रे पाठवून व्यक्त व्हा, स्केचेस काढा, शूट करा फक्त सेल्फीज नको! हेच छोटे छोटे अनुभव तुमची समज वाढविण्यामध्ये तुम्हांला उपयोगी पडतील आणि एक माणूस म्हणून समृद्ध करतील. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडाल, जगाप्रती असलेला तुमचा दृष्टीकोन अधिक उत्क्रांत झालेला असेल.

पालकांना मला सांगावस वाटतं कि आपल्या मुलांची, कुटूंबाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहेच पण मुलांनी, तरुण विद्यार्थ्यांनी प्रवासाचे अनुभव घेऊन त्यातून शिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तुमच्या या नियोजनात सहभागी करा. तुम्ही प्रवास करू इच्छिणाऱ्या जागेबद्दलची माहिती तुमच्या आसपासच्या लोकांनाही काढायला सांगा आणि ती माहिती एकमेकांशी शेअर करा. हॉटेल्स व्यतिरिक्त देखील स्थानिकांच्या घरी राहण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्हाला स्थानिक संस्कृतीच्या निकट जाण्याची, तिथले अस्सल भोजन चाखण्याची संधी मिळते.

गेल्या अनेक वर्षांच्या माझ्या प्रवासाच्या अनुभवावरून मी तुम्हांला हे नक्कीच सांगू शकतो की कमी दिवसांत जास्त स्थळांना, जसे ८ दिवसांत १० स्थळांना भेटी देणे फार काही उत्तम ठरू शकत नाही. यामुळे तुम्हांला त्या जागांचा पूर्णपणे आनंद घ्यायला मिळत नाही. त्यापेक्षा एखादे स्थळ निवडा, त्या जागी काही दिवस तरी मुक्काम करा आणि आजूबाजूच्या ठिकाणांना सखोल पाहा. यातून तुम्हांला अनेक आश्चर्यचकित करून टाकणारे अनुभव येतील.

अनेक अशा सुंदर जागा तुम्ही पाहू शकाल ज्या जास्त लोकांना माहीत नाहीत अथवा प्रसिद्ध नाहीत, निरनिराळया लोकांना तुम्हांला भेटता आल्याने तुम्ही आनंदी व्हाल तसेच अत्यंत सुंदर पदार्थांचा देखील तुम्हाला आस्वाद घेता येईल. तसेच हे सर्व तुम्ही आरामात करत असल्याने तुमचे मन देखील शांत आणि प्रफुल्लित होईल. थांबलेल्या ठिकाणी आसपास चालत भटकणे, हा ते ठिकाण जागा एक्स्प्लोर करण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.

असं म्हणतात कि 'जीवन एक प्रवास आहे'. अगदी खरंय ते, आम्ही पण असं म्हणतो की जर आपण जीवनात विविध ठिकाणी प्रवास केला, अद्भूत स्थळांना भेटी दिल्या तर जीवनाचा हा प्रवास निश्चितच अधिक सुंदर होईल!

(लेखक www.indiaart.com हे आर्ट पोर्टल तसेच मुले आणि युवकांना आपल्यातील सर्जनशीलता खुलेपणाने व्यक्त करता यावी यासाठी 'खुला आसमान' हे विनामूल्य व्यासपीठ चालवित आहेत.)