Articles
भारतीय कलेचा समृद्ध वारसा
मिलिंद साठे | milind.sathe@gmail.com
Sakal | Dec 13, 2017
भारतीय कलेला समृद्ध वारसा लाभला आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर आणि कौशल्याने जे निर्माण करता येईल, किंवा ज्यातून महत्त्वाच्या भावना किंवा कल्पना व्यक्त करता येतील, असं काहीतरी म्हणजे कला, अशी कलेची व्याख्या करता येईल. सर्वसामान्यपणे चित्रे, शिल्प आणि इतर कलाकृतींचा समावेश यात होतो. कलेची व्याख्या आणखी विस्तारली तर वास्तूरचनाशास्त्राचाही यात समावेश होईल.
भारतीय उपखंडातील सुरवातीच्या कलाकृतींचा मागोवा घेतला तर आपण अगदी खूप मागे म्हणजे अश्मयुगात जाऊन पोचतो. मध्य प्रदेशातील भोपाळजवळ भीमबेटका येथील पाषाणावरील चित्रांमध्ये (रॉक आर्ट) मानवी व्यक्तिरेखा व प्राणी चितारण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला.
इसविसनपूर्व तीस हजार वर्षांपूर्वी गुहेत राहणाऱ्या मानवांनी ही भित्तिचित्रे चितारली आहेत. भीमबेटका येथील या गुहा शोधण्याचे श्रेय ख्यातनाम पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. विष्णू वाकणकर यांना जाते. त्यांनी या ‘रॉक आर्ट’ कलाप्रकारावर सखोल संशोधन केले. त्यामुळे मानवी उत्क्रांतीतील या महत्त्वाच्या काळावर प्रकाशझोत टाकला गेला. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये याचा समावेश केला, हे विशेष.
इ.स.पू. २५०० च्या आसपास आग्नेयेकडे उदयास आलेली हडप्पा संस्कृती ही मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. हडप्पामधील नागरी संस्कृती सिंधू नदीच्या काठावरून पश्चिम किनाऱ्यापर्यंत विस्तारली. या काळात नक्षीकाम केलेली मातीची भांडी, छोटी मानवी शिल्पे, बैल, प्राणी, दागिने आणि खेळणी अशा प्रकारच्या कलाकृती तयार केल्या केल्या.
इसविसनपूर्व एक हजार वर्षांनंतर लोकवस्ती सिंधू खोऱ्याकडून गंगेच्या सुपीक सपाट प्रदेशाकडे वळू लागली. जंगले तोडून शेतीसाठी मोकळी जागा करून त्यात शेती करायला सुरवात झाली. शहरे व्यापार आणि उद्योगांची केंद्रे म्हणून विकसित झाली. महाजनपदांचा उदय याच काळात झाला.
आधुनिक राज्य संकल्पनेचे हे सुरुवातीचे रूप म्हणता येईल. सम्राट अशोक हा बौद्ध कलेचा पहिला महत्त्वाचा आश्रयदाता होता. इसविसनपूर्व तिसऱ्या शतकातील अशोकाचा सारनाथ येथील सिंहाचा स्तंभ हा भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक आहे. कदाचित हा अगदी सुरवातीच्या काळातील अजून टिकलेला भारतीय शिल्पाचा अद्वितीय नमुना असेल.
इसविसनपूर्व पहिल्या शतकात आणि इसविसन पहिल्या शतकात, समाजातील सर्व स्तरांच्या पाठिंब्याने महत्त्वाचे बौद्ध प्रकल्प पूर्णत्वाला गेले. हे सार्वजनिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी हातभार लावला, ही बाब उल्लेखनीय आहे. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप हा स्तुपाचा एक उत्तम नमुना आहे आणि तो आजही सुस्थितीत आहे. इ.स.पू.१२० ते इसविसन ४०० पर्यंत प्राचीन व्यापारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात बौद्धविहार आणि चैत्य बांधले गेले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भाजे आणि कार्ले येथे असलेली चैत्यलेणी.
गुप्त काळ (इसवीसन ३२० ते ४६७) हा प्राचीन भारतीय नागरीकरणाचा कळसाध्याय मानला जातो. बिहारमध्ये इसवीसन ३२० मध्ये पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात उदयास आलेले हे साम्राज्य समुद्रगुप्ताच्या काळापर्यंत भरभराटीला आले होते. भारतभर खास करून व्यापाराच्या मार्गावर स्तूप, विहार आणि चैत्य उभारणीची कामे सुरूच होती.
वाकाटक राजघराण्यात राजांनी अजिंठा येथील गुहांमधील भित्तिचित्रे रंगवून घेतली. कलाकारांनी हालचाली, नाट्य, आणि मानवी भावना चित्रबद्ध केल्या. त्यांनी जातककथा आणि बुद्ध जीवनशैली उलगडण्यासाठी विहाराच्या भिंतींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. बोधिसत्त्वातील दोन महत्त्वाची चित्रे वाकाटक राजघराण्यातील हरिसेनाच्या कारकिर्दीत (इसविसन ४६० ते ७७) निर्माण केली गेली. त्यानंतरच्या काळात, अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांच्या केंद्रस्थानी हिंदू मंदिरे होती. दहाव्या शतकातील चोळ राजवटीतील शिव नटराजाचे ब्राँझ धातूचे शिल्प हा कलेचा अद्वितीय आविष्कार म्हणता येईल. प्राणी, पानाफुलांच्या रचना आणि भौमितिक आकारांतील कलाकृती हे या मंदिरांचे वैशिष्ट्य. वेरूळ आणि एलिफंटा येथील दगडात कोरलेली शिल्पे ही वर्णनात्मक शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. इसवी सन आठव्या शतकातील वेरूळ येथील दगडात निर्माण केलेले कैलास मंदिर ही वास्तुस्थापत्यातील एक अद्वितीय कलाकृती आहे.
आठव्या शतकानंतरच्या काळात, दक्षिणेकडील तंजावर, पूर्वेकडील भूवनेश्वर आणि मध्य भारतातील खजुराहो या ठिकाणची मंदिरे त्यांच्या भव्यता आणि सौंदर्यामुळे वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. याशिवाय, अनेक राजवटींनी आपापल्या पद्धतीने भारतीय कलेला समृद्ध केले. दहाव्या शतकानंतर भारतीय उपखंडातील भरभराटीची वर्णने ऐकून उत्तरेकडील मैदानी प्रदेशात तुर्कांनी आणि अफगाणांनी आक्रमण केले. इस्लामी राजवटी आल्यानंतर उत्तर भारतात इस्लामिक वास्तुकलेच्या शैलीने आपला ठसा उमटवला.
(लेखक ‘इंडिया आर्ट गॅलरी’चे आणि www.indiaart.com चे संस्थापक आहेत.)